एकसंबा नगराध्यक्षपदी सुनील सप्तसागर,तर उपनगराध्यक्षपदी सुजाता चितळे : आमदार प्रकाश हुक्केरींकडून अभिनंदन
फोटो एकसंबा :- नगराध्यक्ष सुनील सप्तसागर व उपनगराध्यक्ष सुजाता चितळे यांचे अभिनंदन करताना आमदार प्रकाश हुक्केरी व नगरसेवक.
एकसंबा प्रतिनिधी - अमर माने
अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एकसंबा नगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली. तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत नगराध्यक्षपदी सुनील विश्वनाथ सप्तसागर यांची तर उपनगराध्यक्षपदी सुजाता विनोद चितळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विधान परिषद सदस्य व कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.
एकसंबा नगरपंचायतीसाठी नगराध्यक्षपद सामान्य वर्गासाठी तर उपनगराध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव होते. मंगळवारी सकाळी नगराध्यक्षपदासाठी व उपनगराध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने दोन्ही जागांवर बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर निवडणूक अधिकारी सी. ए .कुलकर्णी यांनी नगराध्यक्ष सुनिल सप्तसागर व उपनगराध्यक्षा सुजाता चितळे यांचा सत्कार केला. यावेळी सर्व नगरसेवकांकडूनही नूतन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांचा सत्कार करण्यात आला.
एकसंबा नगरपंचायतीसाठी 27 डिसेंबर 2021 रोजी निवडणूक झाली होती. अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नगराध्यक्ष निवड अखेर पार पडली. एकसंबा येथील नगरपंचायत काँग्रेस पुरस्कृत आघाडीकडे सत्ता आहे. 17 सदस्य संख्या असलेल्या नगरपंचायतीत काँग्रेस गटाकडे 16 तर भाजप गटाकडे केवळ एक नगरसेवक आहे. या निवडीवेळी सर्व 17 नगरसेवक उपस्थित होते. नगरपंचायतीवर एकहाती सत्ता असल्याने दोन्ही जागांवर काँग्रेसच्या नगरसेवकांची निवड झाली आहे.
आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नाने सरकारनियुक्त नगरसेवकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. शासननियुक्त नगरसेवक म्हणून ज्योती सातवर, महालिंग वस्त्रद, मुनीर दाडीवाले यांची निवड करण्यात आली. यावेळी या तिघांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक विठ्ठल नाईक, सैहिदा मुल्ला, प्रेमा माळगे, राजश्री मगदूम, रवींद्र माने, जन्मुनशा सरदार मकानदार, चिदानंद बेळ्ळी, उमेश सातवर, कलावती माळी, अंकुश खोत, संगीत पवार, शानक्का रांगोळे, किरण माळी, शिवगौडा बावचे, रवींद्र खोत व मान्यवर उपस्थित होते.
आमदार प्रकाश हुक्केरी
एकसंबा नगर पंचायतीत 17 पैकी 16 नगरसेवक काँग्रेस प्रणित आघाडीचे आहेत. आज झालेल्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी सर्वानुमते नगराध्यक्ष म्हणून सुनील सप्तसागर तर उपनगराध्यक्षपदी सुजाता चितळे यांची निवड करण्यात आली आहे. पुढील काळात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी सांगितले.
टिप्पण्या