महिलांनी शस्त्र व शास्त्र दोन्ही घेवून नव्य बदलांचा स्विकार करावा.- कल्पना रायजाधव यांचे प्रतिपादन मलिकवाड येथे सरस्वती महिला व राणी चन्नम्मा संस्थेची वार्षिक सभा
ज्या त्या भागातील लोकांच्या विकासावरूनच त्या भागातील संस्थांची सुदृढता पाहायला मिळते. व्यवहार करताना मानवताही जपणे आवश्यक आहे. महिलांनी शास्त्र व शस्त्र दोन्ही हातात घेऊन नव्या बदलाचा स्वीकार करीत सर्वच दृष्टीने स्वावलंबी होण्यासाठी वाटचाल करावी असे आवाहन कारदगा येथील शिक्षिका कल्पना रायजाधव यांनी केले.
मलिकवाड येथील श्री सरस्वती महिला को-ऑप क्रेडिट सोसायटी व वीर राणी चन्नम्मा महिला दूध सहकारी संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा शोभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. प्रारंभी विविध मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने वार्षिक सभेची सुरुवात करण्यात आली.
यावेळी बोलताना रायजाधव यांनी अलीकडच्या काळात माणसाने आर्थिक उंची गाठण्यासोबत मानवतेचा दिवा मनामनात लावणे आवश्यक बनले आहे. पैसा मुबलक होत आहे तर मानवता घटत आहे. समाजातील दुष्ट विचार अद्याप दूर झालेले नाहीत. परिणामी महिलांनी मनात धाडस, दृष्ट नजरा कमी करण्यासाठी स्वरक्षणासाठी पुढे यावे. मुलांना मोबाईल पासून दूर ठेवून पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे सांगितले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे यांनी मन, मेंदू आणि मनगट यांचा समेट घडवून कोणतेही काम एकाग्रतेने व जिद्दीने केल्यास त्याचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. त्याला ही संस्था कारणीभूत आहे. कोणतेही काम करताना नियोजनबद्ध व बुद्धीचा वापर करणे आवश्यक आहे. दोन्ही संस्थांचा विकास बुद्धी व नियोजनावर अवलंबून असल्याने यशस्वी वाटचाल होत आहे. महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना मूक मोर्चा, कॅण्डल मार्च काढून त्याचा काही उपयोग होणार नसून कायदे कठोर होणे होण्यासाठी सर्वांनी रस्त्यावरची लढाई करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
सदलगा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सदलगा अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी बोलताना आर्थिक संस्था चालवणे अत्यंत कष्टकर काम असते. अचूक नियोजनामुळे खेड्यात असूनही येथील संस्थांचा चांगला विकास झाला आहे. कर्जदार व ठेवीदार दोन्हीही बँकेसाठी महत्त्वाचेच असतात. संस्थांच्या निकोप वाढीसाठी रिझर्व बँकेचे नियम पालन करून वाटचाल करून धोका टाळता येतो असे सांगितले.
यावेळी निवृत्त शिक्षिका सुलोचना कोळी यांनी पाणी, नाणी आणि वाणी जपून वापरणे आवश्यक आहे. जे पुस्तक वाचतात ते माणसं वाचतात. माणसं वाचतात त्यांना माणसं वाचवताही येतात. महिलांनी घराबाहेर पडून संपूर्ण जगातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी अशी व्यासपीठे उपयुक्त ठरतात असे सांगितले.
संस्थापक अध्यक्ष संस्थापक बाळासाहेब पाटील यांनी मुलांचे उच्च शिक्षण व खाद्यपदार्थातील भेसळीकडे सर्वांनी लक्ष द्यावे. प्रारंभीपासून संस्थेची अनेक संकटावर मात करीत यशस्वी वाटचाल झाली आहे. संस्थेची ध्येय उद्दिष्टे निश्चित करून वाटचाल सुरू असल्यामुळे संस्था सक्षम वाटचाल करीत आहे. मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी संस्थेमध्ये सेफ लॉकरची सोय करण्यात आली आहे. तसेच पारदर्शक व्यवहाराबरोबरच महिलांच्या हाताला रोजगार देण्याचा मानस असल्याचे सांगितले.??????????
यावेळी चिदानंद कोरे कारखान्याचे संचालक अण्णासाहेब इंगळे, चिकोडीच्या वंदना भोसले, महादेवी संकपाळ, विजेता पाटील, शमा जमादार आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गुणी विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.
सुलोचना कट्टीकर यांनी सरस्वती महिला पतसंस्थेचे अहवाल वाचन करीत संस्थेत 24 लाख 10 हजाराचे शेअर भांडवल, 2 कोटी 44 लाख रुपये राखीव निधी, 35 कोटी 74 लाखाच्या ठेवी, 29 कोटी 89 लाख कर्ज वितरण, 5 कोटी 50 लाख गुंतवणूक, 85 टक्के वसुली व 40 लाख 30 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाल्याचे सांगितले. वीर राणी चन्नम्मा दूध संस्थेचे अहवाल वाचन पल्लवी पाटील यांनी केले. त्यांनी सभासदांच्या विश्वासाला पात्र राहून नव्या धोरणांवर बदल स्वीकारत वाटचाल करीत शैक्षणिक, सामाजिक, उपक्रम राबवित संस्थेने वाटचाल केली आहे. संस्थेत 597 सभासद, 1.45 लाख शेअर भांडवल, 10.14 लाख राखीव निधी, 49 लाख ठेवी, 15 लाख गुंतवणूक, वार्षिक दूध संकलन 4.70 लाख लिटर व नफा 5 लाख 6 हजार रुपये झाला असल्याचे सांगितले.
यावेळी संस्थेला इचलकरंजी येथे उत्कृष्ट महिला पतसंस्था पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक बाळासाहेब पाटील यांचा के. के. देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत उपाध्यक्ष संभाजी पाटील, नंदा पुजारी, व्ही. पी. बावचे, अशोक पाटील, शंकर मंगावे, बाबासाहेब पाटील, व्ही. जी. पाटील, राजेंद्र पाटील, राजु मुल्ला, निर्मला कांबळे यांच्यासह संस्थेच्या संचालिका, सभासद, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यशोदीता पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक तर भारती बाकळे व संस्थेचे मुख्य व्यवस्थापक राजेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. हसीना अपराज यांनी आभार मानले.
टिप्पण्या