'महावीर' मधील मराठी वाड्मय मंडळ वाचन संस्कृती जोपासते.! - कृष्णात खोत
महावीर महाविद्यालयातील मराठी वाड्मय मंडळाच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण होऊन ते २५ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या वाड्मय मंडळाने अनेक लेखकांच्या कलाकृती संग्रहित केल्या असून त्या विद्यार्थ्यांकडून वाचून घेतल्या आहेत. आजच्या विविध माध्यमांच्या भाऊगर्दीत महावीर मधील मराठी वाड्मय मंडळाने वाचन संस्कृती जोपासण्याचे मोठे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्य केले आहे. आणि ते पुढे करीत राहतील असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त 'रिंगाण'कार कृष्णात खोत यांनी काढले. ते महावीर महाविद्यालयात मराठी वाड्मय मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर .पी. लोखंडे तर बी.ए .बी.एड. चे समन्वयक डॉ. महादेव शिंदे , प्रा. जयवंत दळवी , प्रा.डॉ.गोमटेश्र्वर पाटील व डॉ.शरद गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
खोत ,पुढे म्हणाले, 'सूचने' हा लेखकाचा सण असतो. लेखक सुचलेल्या गोष्टींवर जितके दिवस काम करत असतो; तो त्याचा उत्सव असतो. तो कधीच एकटा नसतो. त्याला कलाकृतील पात्रांची सोबत असते. आजचा काळ हा थैमान घातलेल्या हिंसक मानवी प्रवृत्तींचा काळ आहे. या काळात माणसाला माणसासारखे जगणे असह्य होऊन बसले आहे, तेव्हा मूळ मानवी प्रवृत्तींवर नियंत्रण किंवा ताबा मिळण्याचे एक महत्त्वाचे साधन वाचन हे आहे. वाचनाचा रियाज करा, तुमची साहित्यिक समज वाढेल आणि जीवन जगणं सुसह्य होईल. तेव्हा वाचत राहा. असा मूलमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. लोखंडे म्हणाले , कादंबरीकार कृष्णात खोत यांची नुकतीच प्रकाशित झालेली "काळ्या -माळ्या भिंगोळ्या" या कादंबरीवर महाविद्यालयात एक चर्चासत्र आयोजित करण्याचा मानस आहे. याप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्याबद्दल कृष्णात खोत यांचा सत्कार महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. तसेच वाड्मय मंडळाच्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यातील साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच्या कलाकृतींचे पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. गोपाळ ओमाणा गावडे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय डॉ. विनोद कांबळे यांनी करून दिला.कार्यक्रमाचे आभार विपुल कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन नाजनीन नदाफ यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ . शशिकांत अन्नदाते, प्रा . अजित चौगुले, डॉ. शंकर धनवडे, महाविद्यालयातील विद्यार्थी व दादासाहेब मगदूम हायस्कूलचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..
टिप्पण्या