वाड - वडिलांची सेवा करा , निंदा करशील तर यमदुती जाशील . यड्रावमध्ये श्री लक्ष्मी देवीच्या यात्रेत भाकणुक
जो गुरूच्या मार्गात राहिल, तो सुखाने जगेल. चांगलं वागा, गर्व अहंकार करू नका. अंधश्रध्दा पाळू नका. आई लक्ष्मी ईच्छा पुर्ण करेल. भक्ती ठेवा पाप माजल, उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा हिवाळा होत चाललाय. पडल तिथं पडल. बांधाला बांध, शिवाला शिवय हाय रे.. बाळानो. पुण्याचं पारडं धरून चला. वाड-वडीलांची सेवा करा. निंदा करशील यमदुती जाशील. अशी भाकणूक श्री सिध्द सोनु देवा यांनी केली.
यड्राव (ता.शिरोळ) येथे श्री लक्ष्मी (रिध्दी-सिध्दी) देवीची यात्रा मोठ्या भक्तीपुर्ण वातावरणात पार पडली.
सतीयुग गेलं कलयुग आलं. डोंगरा ऐवढं पाप, बोर्या ऐवढ्या पुण्यावर तरू लागलंय. बारा गावची बारा वर्षाची मुलगी भरताळ माजल. नवनवीन आजाराला बळी पडशिला. भगवा झेंडा राज्य करेल. पाऊस पाण्यात मिरग गाजल, राहिणी साजेल, तांबडं धान्य उदंड पिकेल. पांढरं फुल मोलाने विकेल.
यड्रावच्या पांढरीला, गादीला जोडीच्या बहिनीचा रहिवास झाला. माता भगीनींची नजर हाय आपल्या गावाला. जोपर्यंत श्रध्देने येशीला त्याचं मागणं पुर्ण करेल. नियतीचा नियम आदिशक्तीचे बळ भरलं हाय गावाला. विषारी नागानं हजेरी लावलंय गावाला.
आईच्या भक्तीत खंड नको पाडू, केलेली पुजा देवाच्या चरणी मान्य हाय. भक्तीत खंड पाडशिल राखन विसरेल. एकी फुटली हाय, एकीने रहा. तुम्ही केलेली पुजामान्य हाय. असेच पुढं राहशीला आनंदी राहशीला.
वारूळ मकनातून काशीलिंग बिराप्पा तुझ्या गावावर नगर ठेवलाय. भिऊ नकोस लक्ष्मी मातेची राखन हाय. वर्षाची भक्ती करत चला. विषारी नाग पाठिशी राहिल तुमच्या. श्री सिध्द सोनु देवा यांनी ही भाकणूक केली.
यावेळी तारदाळचे श्री देवमामा यांनी आनंदाच्या भारात भरकटत जाऊ नका. गावची राखन करणारी माऊली वर्षातून एकदा भेट देणार. मेढीची राखन गावाला लाभ आहे. मेघाची गर्जना, वीज कडकडेल आणि सर्वांना आनंद देऊन जाईल. गावच्या धन्यानं गावची काळजी घ्यावी. अशी भाकणूक केली.
प्रारंभी सरकार वाडा येथे श्री लक्ष्मी देवी पालखीची ओटी सौ.सवितादेवी नाईक निंबाळकर यांनी भरली. तर सत्येंद्रराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यानंतर पालखी वाड्यातून प्रस्थान होऊन गावप्रदक्षिणा करीत सायंकाळी सात वाजता पालखी मंदिरात आला. यावेळी महाआरती, हेडम व भाकणूक झाली. यावेळी यड्राव, शहापूर, तारदाळचे वालूक पालखी मिरवणूकीत सहभागी झाले होते. दरम्यान, सायंकाळी आरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सरपंच कुनालसिंह नाईक निंबाळकर, देवराज नाईक निंबाळकर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष केशव धुमाळे, पालखीचे मानकरी यांच्यासह ग्रामस्थ पालखी मिरवणूकीत सहभागी झाले होते.
टिप्पण्या