सेवानिवृत्त प्राध्यापक शेख शफी यांचे निधन.
शिवाजी शिंदे
परभणी :दि.30 येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील मराठी विभागाचे माजी प्रमुख सेवानिवृत्त प्राध्यापक शेख शफी यांचे शनिवार दि.30 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12 वा. परभणीतील एका खाजगी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी ते 76 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ समीर शफी, मुलगा डॉ. समीर शफी, तीन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दरम्यान, शनिवारी (दि.30) सायंकाळी 6 वाजता काद्राबाद प्लॉट येथील स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी होणार आहे. एक विद्यार्थीप्रिय, प्रचंड अभ्यासू, ग्रामीण विद्यार्थी व जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक चळवळीतील तळमळ असणारा, कलावंताना आधार देवून भक्कम पणे प्रोत्साहन देणारा सच्चा शिक्षक,कलावंत काळाच्या पडद्याआड गेल्याने शोक व्यक्त होत आहे. शिवाजी महाविद्यालयात दीर्घकाळ मराठी विभाग प्रमुख म्हणून कामगिरी बजावणारे प्रा. शेख शफी हे शहरासह जिल्ह्यातील साहित्य, सांस्कृतिक व नाट्य क्षेत्रात सक्रिय होते. विशेषतः प्रा.शफी यांनी आपले योगदान देवून ग्रामीण विद्यार्थ्यांना घडविण्याचे उत्तमरीत्या काम केले. त्यामुळेच ते सर्वदूर परिचित व लोकप्रिय होते. अत्यंत शांत, संयमी, मृदु भाषिक असणारे प्रा. शफी यांनी परभणी तील अनेक कार्यक्रमा त बहारदार सूत्रसंचलन करून ते कार्यक्रम सस्मरणीय केले. महाविद्यालयीन सेवेत आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सव, केंद्रीय युवक महोत्सवात त्यांनी परीक्षक म्हणून काम केले. श्री शिवाजी महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणून अनेक कला प्रकारात त्यांनी महाविद्यालयास भरघोस पदके मिळवून दिली. संत साहित्य हा त्यांच्या व्यासंगाचा विषय होता. प्रसिद्ध कवी प्रा.फ.मुं.शिंदे यांनी आपला पहिला कविता संग्रह ‘जुलूस’ प्रा.शेख यांना अर्पण केलेला आहे. प्राचार्य रा.रं.बोराडे यांचा नाट्यलेखन प्रवास प्रा.शेख शफी यांच्या सारखे हुरहुन्नरी विद्यार्थी भेटल्याने सुरु झाला. ‘मराठवाड्याचा मळा आणि खानदेशचा गळा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे ते निवेदक आणि सूत्रधार होते. प्रसिद्ध बासरी वादक दत्ता चौगले यांच्या ‘दुष्यंतकुमार की गझले’ या कार्यक्रमाची निर्मितीही त्यांनी केली.
टिप्पण्या