चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर परिसरात तंबाखू व मिरची लावणीच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ...
विशाल क्रांती न्युज साठी प्रतिनिधी
अण्णासाहेब कदम सदलगा.-
आता गेल्या पंधरा दिवसापासून सर्वत्र पावसाने ओढ दिली असून अडसाली उसाच्या लागणी जोमाने सुरू आहेत. त्या ऊसात आंतरपीक व इतर ठिकाणी तंबाखूची लागण फार मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र सदलगा, मलिकवाड, एकसंबा, जनवाड ,बोरगाव, वडगोल, बहिणाकवाडी, नेज, बेडकिहाळ, शमनेवाडी, भोज व कारदगा या भागात दिसत असून, शेतकऱ्यांनी तंबाखूला व मिरची लागवडीला पसंती दिली आहे .तंबाखूच्या लागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फार मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहेत. तंबाखू पिकाची बेवड ही ऊस पिकाला पोषक असून खतांची मात्रा देखील कमी लागते, या हिशोबाने सदलगा दूधगंगा नदी परिसरातील सर्व शेतकरी तंबाखू व मिरची कडे वळलेले दिसत आहेत. अति पाऊस व रोगराई या दोन संकटातून जर मिरची व तंबाखू वाचला तर मात्र बळीराजा निश्चितच आर्थिक दृष्ट्या सबल होईल यात वाद नाही. आता चिकोडी व निपाणी तालुक्यातील अनेक भागांमध्ये तंबाखू व मिरची लागणीच्या कामाला फारच जोम धरला आहे. तंबाखू लागणीसाठी मजुरांचा तुटवडा देखील फार मोठ्या प्रमाणावर भासत आहे. मजुरी देखील वाढीव घेतली जात असून वेळेवर मजूर मिळणे देखील अवघड झाले आहे.
टिप्पण्या