मिरजकर यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन
नव्वदोत्तर कालखंडातील महत्त्वाचे कवी डाॅ.श्यामसुंदर मिरजकर यांच्या 'अस्वस्थ शहराच्या कविता' या कवितासंग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन शनिवार, दि. ९ सप्टेंबर रोजी इचलकरंजी येथील नाईट काॅलेजमध्ये संपन्न होत आहे. मराठीतील प्रसिद्ध कवी आणि समीक्षक डाॅ. रफीक सूरज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. प्राचार्य डॉ.पी.डी.नारे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आहेत. यावेळी कवी डाॅ.श्रीकृष्ण महाजन आणि कवी प्रसाद माधव कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती राहाणार आहे.
कामगारांचे जगणे आणि त्यांचे प्रश्न अधोरेखित करणारा श्यामसुंदर मिरजकर यांचा हा कवितासंग्रह २००१ साली साहित्य संस्कृती मंडळाच्या अनुदानातून प्रकाशित झाला होता. ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांनी या संग्रहाच्या प्रथमावृत्तीची पाठराखण केली होती. महाराष्ट्रातल्या नामांकित साहित्य संस्थांचे प्रतिष्ठेचे वाङ्मय पुरस्कार या संग्रहाला मिळाले आहेत. सुमारे बावीस वर्षानंतर आता नव्या स्वरूपात हा संग्रह आता प्रकाशित होत आहे. इस्लामपूरच्या नाग-नालंदा प्रकाशनाने संग्रहाची दुसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. समीक्षक दा.गो.काळे यांनी संग्रहाची पाठराखण केली आहे. चित्रकार गणेश पोतदार यांनी मुखपृष्ठ साकारले असून चित्रकार प्रशीक पाटील यांनी अत्यंत समर्पक रेखाटने रेखाटली आहेत. नाईट काॅलेज ऑफ आर्टस अॅन्ड काॅमर्स, इचलकरंजीचा मराठी विभाग आणि नाग-नालंदा प्रकाशन प्रकाशन समारंभाचे नियोजन करीत आहेत. यावेळी निमंत्रित कवींचे कविसंमेलनही आयोजित केले आहे. लवकरच श्यामसुंदर मिरजकर यांच्या 'नारीजातक' या काव्यसंग्रहाची दुसरी आवृत्ती देखील प्रकाशित होणार आहे.
टिप्पण्या