मुलांच्या जडणघडणीत आई बाबांची भूमिका महत्वाची : ॲड. प्रा .श्रीकांत माळकर., राजाराम विद्यालयातील बालसंस्कार शिबिराची सांगता
शिरोळ : प्रतिनिधी :
केवळ पुस्तकी ज्ञानामुळे बालकांचा व्यक्तिमत्व विकास होत नाही पालकांनी सुद्धा आपली जबाबदारी ओळखून बालकांच्या संपूर्ण विकासासाठी बालमनावर सुसंस्कार करीत त्यांना संस्कारक्षम बनवणे गरजेचे आहे तरच येणारी भावी पिढी सुजाण होईल यासाठी मुलांच्या जडणघडणीत आई-बाबाची भूमिका महत्त्वाची आहे असे विचार प्रसिद्ध व्याख्याते ॲड. प्रा. श्रीकांत माळकर यांनी व्यक्त केले.येथील राजाराम विद्यालय नं 2 या शाळेत दोनदिवसीय बालसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या सांगता समारंभात प्रा. श्रीकांत माळकर यांचे *बालक- पालक सुसंवाद व आपल्या मुलांचा व्यक्तिमत्व विकास* याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.
प्रा.श्रीकांत माळकर बोलताना पुढे म्हणाले की ," संस्कारक्षम बालक घडवण्याची खरी जबाबदारी आईची असते पण सध्या हीच आई टीव्हीवरील मालिकेत गुंतली असल्यामुळे आपल्या मुलांवर तिचे लक्ष नाही याचा परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत आहे. यासाठी आपला मुलगा काय करतो आहे याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे. मुलांना योग्य दिशा मिळावी यासाठी महापुरुषांची जीवनचरित्रे व चांगली पुस्तके त्यांना वाचण्यास द्यावीत. त्यांच्या आरोग्याकडे व आहाराकडे संपूर्ण लक्ष द्यावे. संस्कार कथा सांगून त्यांची मने प्रगल्भ करावीत. वाचन ,मनन, लेखन श्रवण याबरोबरच मैदानावरील खेळांना प्रेरणा व चालना द्यावी. आपल्या मुलाशी सुसंवाद साधत त्याच्या आवडीनिवडी जाणून घेऊन त्याप्रमाणे त्याला संस्कारित करणे गरजेचे आहे .आपल्याला भावी पिढी संस्कारक्षम बनवण्यासाठी शिक्षकांबरोबरच पालकांनी सुद्धा मुलांच्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्यांना संस्कारीत करणे ही सध्या काळाची गरज बनली आहे. त्यामुळे पालक आणि शिक्षक या दोन्ही घटकांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे जातीने लक्ष देणे आवश्यक असून ती आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवणे आवश्यक आहे ,असे शेवटी सांगितले
शाळेचे अध्यापक सनी सुतार यांनी स्वागत केले. मुख्याध्यापिका सौ.निता चव्हाण यांनी प्रास्तावित केले. शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख अण्णा मुंडे सर , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे, उपाध्यक्षा शितल जगदाळे ,सदस्य चंद्रकांत भाट यांनी मनोगत व्यक्त केले.या समारंभास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अभिजीत माने ,सचिन सावंत ,प्रियंका इंगळे ,सारिका सकट, सामाजिक कार्यकर्ते खंडेराव हेरवाडे, शाळेच्या अध्यापिका त्रिशला येळगुडे ,मीनाक्षी हेगाण्णा ,सुनंदा पाटील ,स्वाती जगदाळे ,सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या