शिरटीत श्री भैरेश्वर यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक उत्साहात
जयसिंगपूर प्रतिनिधी: शिरटी( ता शिरोळ) येथील जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी सकाळी श्री भैरेश्वराची पालखी मिरवणूक सोहळा धार्मिक व भक्तीमय वातावरणात आणि अमाप उत्साहात पार पडला. या निमित्ताने भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबरे व भंडाऱ्याची उधळण करीत श्री भैरेश्वराच्या नावानं चांगभलंचा अखंड जयघोष करून श्री भैरवेश्वराच्या पालखीचे दर्शन घेतले
जागृत ग्रामदैवत श्री भैरेश्वर देवाच्या यात्रेस शनिवारपासून सुरुवात झाली या निमित्ताने भाविकांनी शनिवारी रात्री देवास दंडवत घालून आपली मनोकामना पूर्ण केली तसेच रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले यावेळी श्री भैरेश्वरास अभिषेक घालून पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला दरम्यान यात्रेच्या मुख्य दिवशी सोमवारी मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांची गर्दी झाली होती धनगरी ढोल पारंपारिक वाद्याचा निनादात पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी उपस्थित भाविकांनी मुक्तपणे गुलाल खोबरे व भंडाऱ्याची उधळण करून भैरेश्वराच्या नावानं चांगभलं चा गजर करीत पालखी व भैरेश्वराचे दर्शन घेतले
श्री भैरवेश्वराची पालखी व श्री रेणुका मातेचा जग यांची मंदिराची फेरी काढून हाळभैरीकडे जाऊन तिथे पूजा व आरती होऊन परत गावाकडे येऊन गावातील हनुमान मंदीरास फेरी काढून परत मंदिराकडे गेली. यावेळी रस्त्यावर सडा मारून रांगोळी घालून व पालखीत पाणी घालून ग्रामस्थांनी पालखीचे दर्शन घेतले
या पालखी सोहळ्याला भाविक व ग्रामस्थांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. श्री भैरेश्वराच्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करून भाविकांनी दर्शन घेतले यावेळी यात्रा कमिटीचे सदस्य मानकरी पुजारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
सोमवारी रात्री ऑर्केस्ट्रा वैभव हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी यात्रेच्या निमित्ताने सकाळी ९ वाजत बैल हातात धरून पळणे,रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा, लुना शर्यत, तसेच सायंकाळी ४ वाजता संगीत खुर्ची स्पर्धा होणार आहे. तसेच भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार आहे.
सरपंच हसीना मुलाण्णी उपसरपंच प्रकाश माळी ग्रामपंचायत सदस्या अनिता चौगुले भारती माळी शुभांगी शिरगांवे माजी सरपंच राहुल सूर्यवंशी माजी उपसरपंच सागर पवार अलमनिसार मुल्लाणी सतीश चौगुले प्रकाश उदगांवे राजकुमार शिरगांवे सुनील माळी लक्ष्मण भोसले भैरेश्वर युवक यात्रा कमिटीचे अध्यक्ष निखिल पाटील उपाध्यक्ष संग्राम शिंदे कार्याध्यक्ष रामदास भंडारे सागर पवार सेक्रेटरी अमोल उदगांवे रविराज पाटील खजिनदार संदीप चौगुले व्यवस्थापक रमेश चौगुले पंकज परीट कुलदीप बनजवाडे संदीप रोजे प्रमोद उदगांवे रजत उदगांवे ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचारी पोलीस पाटील गावातील मानकरी मंदिराचे पुजारी गुरव बंधू यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले
टिप्पण्या