जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राला एकाच ग्रामपंचायत मध्ये आठ वर्षे कामकाज करणाऱ्या ग्रामसेवकांचा खो : वसंतराव देसाई यांचा आरोप
जयसिंगपूर प्रतिनिधी - बहुजन ग्रामविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर पहिल्याच गावसभेत देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्राच्या वतीने पत्र देऊन सुद्धा ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे स्थानिक प्रशासन स्थळावर कार्यवाही होत नसल्यामुळे गाभाऱ्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा मंजूर निधी मिळणार नाही. त्यामुळे मंदिराचे काम कित्येक वर्षापासून रखडले आहे. रखडलेल्या कामाला गती देण्यासाठी स्थानिक प्रशासन स्तरावर कागदपत्रांची पूर्तता करून प्रयत्न करावेत अन्यथा ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात वरिष्ठ कार्यालयाकडे तक्रार करणार असल्याची माहिती बहुजन ग्रामविकास आघाडीचे नेते माजी सरपंच वसंतराव देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सन २००७ साली सरपंच म्हणून मी कारभार स्वीकारला. २००८ मध्ये जुने हनुमान मंदिर पाडून जागा खरेदीसाठी ७ लाख रुपये स्वतः कडील खर्च केले. माझ्या सरपंच पदाच्या काळात मंदिराचे काम ११ लाख रुपये स्वतःच्या खर्चून कळसापर्यंत नेण्याचे काम केले. तसेच हनुमान मंदिराला क वर्ग दर्जा मिळवून दिला. त्यानंतर सत्तांतर झाले, तेव्हापासून सदरच्या मंदिराचे काम रखडले आहे. मंदिराच्या पुढील सभा मंडपासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून निधी प्राप्त झाला आणि त्याचेही काम पूर्ण झाले. मात्र मंदिर गाभारा बांधण्यासाठी शासनाचा निधी खर्च करता येत नाही, त्यासाठी लोकवर्गणी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच निधी देऊ शकते. मात्र, गेल्या दोन वर्षापासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने तीन वेळा पत्रे पाठवून सुद्धा ग्रामसेवकांच्या दुर्लक्षामुळे देवस्थान समितीला कागदपत्रांची पूर्तता झाली नाही. त्यामुळे देवस्थान समितीचे एकूण मंजूर सात लाखांच्या निधीपैकी फक्त 50 हजार रुपयांचा निधी त्यावेळी प्राप्त झाला आहे. इतर निधीसाठी उपसमिती नेमणे गरजेचे असल्याने याबाबत हालचाली करणे गरजेचे आहे. गेल्या वर्षभरापासून हनुमान भक्त मंडळ आणि युवकांच्या माध्यमातून गावातून ३ लाख रुपये लोकवर्गणी जमा करण्यात आली आहे. युवकांच्या सहभागातून हनुमान जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यांचे कार्य कौतुकास पात्र आहे. जर उपसमिती नेमल्यास देवस्थान समितीचा निधी आणि लोकवर्गणी याचा मेळ घालून गाभाऱ्याचे बांधकाम पूर्ण होईल, आणि गावाला सुसज्ज असे मंदिर तयार होईल. यामध्ये माझ्याकडूनही १ लाख रुपये देणगी स्वरूपात देण्याची तयारी आहे. एकंदरीत ही सर्व बाब पाहता लोकसहभाग वाढलाय मात्र ग्रामसेवकांचा कारभार रेंगाळलाय असा प्रकार हेरवाड मध्ये घडत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्षता जिल्हाधिकारी अमोल एडके यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचीही त्यांनी यावेळी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले.
हेरवाडचे श्रद्धास्थान असलेले हनुमान मंदिराचे काम उपसमिती नियुक्त न झाल्यामुळे रखडले आहे. देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला गेल्या दोन वर्षात तीन वेळा पत्र आले आहे. पहिल्या पत्राच्या माध्यमातून गावसभेत उपससमिती नेमण्याचा ठरावही करण्यात आला आहे. मात्र, ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गावच्या विकासाला खोडा घालण्याचे काम ग्रामविकास अधिकारी करीत आहेत. देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र यांच्या वतीने तीन पत्रे पाठवून सुद्धा उपसमिती नियुक्त करण्यात येत नसल्याने संबंधित ग्रामीण सेवकांच्या विरोधात गटविकास अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून सदरची उपमिती नियुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
टिप्पण्या