उदगांवमध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकार्यांना परतवलेजुन्या बायपासवरून महामार्ग न्या : चौपट भरपाई द्या
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी सोमवारी उदगांव (ता. शिरोळ) येथे मोजणी करण्यासाठी प्राधिकरण अधिकारी व भूमि अभिलेखचे अधिकारी आले होेते. यावेळी उदगांव परिसरातील शेतकरी एकत्रित येऊन सध्या असलेल्या बायपास महामार्गावरूनच होणारा मार्ग न्या व शेतकर्यांना बाजारभावाच्या चौपट भरपाई द्यावी. या मागणीसाठी मोजणीला आलेले अधिकार्यांना शेतकर्यांनी परतवून लावले.
उदगाव येथे शेतकर्यांना सोमवारी मोजणी होणार असल्याच्या नोटिसा शनिवारी व रविवारी मिळाल्या आहेत. एकीकडे प्राधिकरण विभागाने शेतकर्यांना विश्वासात न घेता महामार्ग करण्याचा घाट घातला आहे. दुसरीकडे शेतकर्यांच्या जमिनी मोजण्यासाठी किमान सात दिवस अगोदर नोटिसा देणे आवश्यक असते. मात्र एक किंवा दोन दिवस अगोदर नोटिसा देऊन प्राधिकरण विभागाने मनमानी कारभार सुरू करीत असल्याचा आरोप करून सकाळी दहा वाजता सर्व शेतकरी उदगांव ग्रामपंचायतीमध्ये जमले.
त्यानंतर हे अधिकारी सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गावर उदगांव हद्दीत मोजणीला सुरूवात करणार असल्याचे कळाल्यानंतर शेतकर्यांनी शेतात धाव घेतली. यावेळी भारतीय किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ शिंदे, शेतकरी सुदर्शन मगदूम, सागर साखळे, राजकुमार आडमुठे, सन्मती पाटील, डॉ. सुहास मगदूम यांच्यासह शेतकरी एकत्रित येऊन प्राधिकरण विभागाचे सहाय्यक अभियंता गोविंद भैरवाल, अजित महात्मे यांच्यासह मोजणी अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले.
शेतकर्यांचा विरोध असताना आपण प्रत्येक गावात मोजणीसाठी येत आहात. प्रथम जुन्या बायपासवरून महामार्ग करा, चौपट भरपाई द्या, अशी मागणी असताना याकडे दुर्लक्ष करून प्राधिकरण विभागाचे मनमानी पध्दतीने शेतकर्यांच्यावर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. पुन्हा मोजणीला आला तर मोजणी करू देणार नाही. सर्व शेतकरी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील, असा इशारा भारतीय किसान संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सिध्दार्थ शिंदे यांनी दिला. त्यामुळे मोजणीला आलेल्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. यावेळी अनेक शेतकर्यांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
यावेळी अनमोल मगदूम, बाळ संकपाळ, युवराज वरेकर, दिगंबर संकपाळ, महावीर साखळे, पोलिस निरिक्षक सत्यवान हाके, कृषीसहाय्यक एस.आर.माळी, तलाठी एस.ए.बरगाले, पोलिस पाटील अनुराधा कांबळे, चेतन खोंद्रे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
मोजणीसाठी आलेले प्राधिकरण विभागाचे अधिकारी गोंविद भैरवाल यांना शेतकरी मराठीत बोलून आपल्या अडचणीत सांगत होते. यावेळी भैरवाल यांनी मुझको मराठी समझमे नही आती, असे म्हटल्यानंतर थेट शेतकर्यांनी फाडफाड इंग्रजी बोलून आपल्या अडचणी सांगू लागल्या. यावेळी सर्वच अधिकार्यांना चांगलाच घाम फुटला. अखेर शेतकर्यांनी तुमच्यापेक्षा इंग्रज बरे, असे म्हणून या आलेल्या पथकाला परतवून लावले.
टिप्पण्या