यमगर्णी जवळील सहारा हॉटेल नजीक ४० वर्षीय युवकाचा चाकूने भोसकून निघृण खून
निपाणी नजीक असलेल्या यमगर्णी हद्दीत पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गालगत लागून असलेल्या हॉटेल सहारा हायवे नजिक एकाचा निघृण खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास उघडकीस आली. संतोष विश्वनाथ चव्हाण (वय ४०, रा. यमगर्णी) असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान संशयीत आरोपी सौरभ वसंत कोरवी (वय २६ रा. यमगर्णी) याला बसवेश्वर चौक पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी चालवली आहे. विशेष म्हणजे निपाणी शहरात गेल्या आठवड्यात बुधवार ऑक्टोबर 2 रोजी युवकाचा खून झाल्यानंतर लागलीच ही घटना नवव्या दिवशी घडल्याने पोलीस यंत्रनेची झोप उडाली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत संतोष चव्हाण हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून परिचित होते. तर संशयित आरोपी सौरभ कोरवी हा खाजगी नोकरी करीत होता. दरम्यान सौरभ याने अनेक लोकांची फसवणूक चालवली होती. त्याच्या फसवणुकीला बळी पडू नका असे संतोष चव्हाण यांनी काही जणांना सांगितल्याचा राग मनात धरुन सौरभ याने संतोष त्याला चाकूने भोसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर मयत व आरोपी आणि त्यांच्यासह त्यांचे मित्र मंडळी सहारा हॉटेल जवळ काही कामानिमित्त गेले होते. बाकीचे मित्र इतर तर चर्चा करत असताना हे दोघे बाजूला जाऊन चर्चा करत असताना हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी अवस्थेत संतोषला महात्मा गांधी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी संतोष मयत झाल्याचे घोषित केले. पोलिसांनी महात्मा गांधी रुग्णालयात भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हा पो. प्रमुख डॉ, भीमाशंकर गुळेद डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय
बी.एस.तळवार, बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने संशयित आरोपीला ताब्यात घेतले. रात्री उशिरा त्याची कसून चौकशी सुरु होती. गुरुवारी रात्री अचानकपणे खून झाल्याने परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मयत संतोष याच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपी सौरभ कोरवी याच्या विरोधात रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सीपीआय बी.एस. तळवार हे करीत आहेत. निपाणी परिसरातील खुनाची ही नऊ दिवसात दुसरी घटना घडली आहे, या घटनेमुळे यमगरणी सह निपाणी परिसरात घबराट पसरली आहे.
टिप्पण्या