शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेगः सीमेवर ५ चेकपोस्टवर ४५ कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती
शिरोळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शी पद्धतीने पार पडण्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी सुरू केली आहे. तालुक्याच्या सीमेवर पाच चेकपोस्ट उभारण्यात येणार असून त्यासाठी १५ टीमच्या अंतर्गत ४५ कर्मचाऱ्यांची नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षितता राखण्यासाठी या कर्मचाऱ्यांमध्ये पोलिस विभाग आणि प्रशासकीय अधिकारी यांचा समावेश आहे.
नोडल अधिकारी, पोलिस कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना विविध पथकांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. हे पथक मतदान प्रक्रियेदरम्यान देखरेख आणि सुरक्षा यंत्रणांचे नियोजन करतील. याशिवाय, मतदानाच्या प्रत्येक टप्प्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी सहा पथकांची स्थापना करण्यात येणार आहे, ज्यात तांत्रिक तज्ञ आणि पोलिस कर्मचारी सहभागी असतील.
शिरोळ तालुक्यातील मतमोजणी प्रक्रिया तहसील कार्यालयात पार पडणार आहे. यासाठी प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज केली आहे. तहसील कार्यालयात मतमोजणीचे योग्य नियोजन आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रक्रियेची तयारी सुरू आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच सर्व पथकांच्या नेमणुकीचे आदेश अधिकृतरीत्या लागू करण्यात येणार आहेत.
टिप्पण्या