यड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहती मधील श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग . आगीत सुमारे दिड कोटी रुपयांचे नुकसान.
यड्राव (प्रतिनिधी ) यड्राव (ता. शिरोळ) येथील पार्वती औद्योगिक वसाहतीत असलेल्या श्री गणपती टेक्स्टाईल कंपनीला सोमवारी मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत कच्चा माल, मशिनरी, इमारतीचे बांधकाम आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
ही घटना सोमवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. कंपनीच्या मालक संगीतादेवी सुरेश माथूर यांना कर्मचाऱ्यांनी फोन करून याबाबत माहिती दिली. कंपनीला सोमवार सुट्टी असल्याने दिवसभर बंद होती. मात्र, येथे वस्तीस असणाऱ्या कर्मचारी लघुशंकेश उठल्यानंतर रात्री अचानक आग लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही माहिती सुरेश माथूर यांना दिली.
ही आग आटोक्यात आणण्यासाठी इचलकरंजी, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि सांगली येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. तब्बल चार ते पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. आगीत अंदाजे ७० ते ७५ लाख रुपयांचा कच्चा माल, २५ लाख रुपयांची मशिनरी आणि इमारतीचे इतर साहित्य जळाले आहे.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाने मोठ्या शर्तीने ही आग आटोक्यात आणली नसती, तर जवळच्या इतर कंपनींना आग लागूनही आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता होती.
घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद पोलिसात झाली नव्हती.
टिप्पण्या