रसिकांच्या भरगच्च प्रतिसादात रंगला 'आला रे राजा' चा नाट्यप्रयोग._प्रेक्षकांच्या निर्णायकतेचा ताबा घेणारे नाटक - दा.गो. काळे_

बुलढाणा (  सारंग महाजन  ) येथील अक्षरदेह नाट्यकला संस्थेने आयोजित केलेल्या माणुसकी फाऊंडेशन निर्मित "आला रे राजा" या नाट्यप्रयोगाला रसिकांचा भरगच्च प्रतिसाद लाभला. प्रहसनातून फुललेली राजकीय शोकांतिका असलेले हे नाटक प्रेक्षकांच्या निर्णायकतेचा ताबा घेते व त्यांच्यात नव्याने सुरु होते, असे मत जेष्ठ समीक्षक दा. गो‌ काळे यांनी व्यक्त केले. 
           येथील गोवर्धन सभागृहात ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या प्रयोगाचे उद्घाटन जेष्ठ समीक्षक दा. गो. काळे यांच्या उपस्थितीत नटराज पूजन करुन करण्यात आले. डॉ. सौ. निलिमा दुर्गासिंग जाधव, डॉ. निखिल नलावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मृणाल सावळे, संतोष पाटील, गणेश राणे, विजय सोनोने यांच्याहस्ते त्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार  करण्यात आला. कामगार कल्याण मंडळाच्या स्पर्धेत अभिनय व प्रकाश योजनेसाठी पारीतोषिक मिळवणारे गणेश देशमुख व लक्ष्मीकांत गोंदकर यांचा यावेळी अक्षरदेहच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.  त्यानंतर रसिकांच्या भरगच्च उपस्थितीत दिलीप जगताप लिखित व विजय सोनोने दिग्दर्शित आला रे राजाच्या नाट्यप्रयोगास प्रारंभ करण्यात आला. रंगमंचावर धगधगती  चिता, मानवी कवट्या, सापळे, घंटा व कवट्यांवर उभारलेले राजसिंहासन , राजदंड अशा सूचक प्रतिकांचा वापर करुन पराग काचकुरे यांनी उभारलेले नेपथ्य लक्षवेधी ठरले. लक्ष्मीकांत गोंदकर यांनी अर्थवाही प्रकाश योजना देऊन रंगमंच जिवंत केला. विजय सोनोने यांचे संगीत, प्रवीण इंगळे यांनी केलेली रंगभूषा व डॉ. स्वप्नील दांदडे, पंजाबराव आखाडे, कल्याणी काळे यांनी केलेली वेशभूषा नाटकाला पुरक ठरली.  नाटक सर्वाधिक उंचीवर पोहोचले ते सुप्रसिद्ध सिने अभिनेते गणेश देशमुख यांच्या अभिनयाने. नाटकातील राजा साकारताना त्यांनी रसिक मनावर पूर्ण  ताबा घेतला. त्यांची भूमिका अभिनय क्षेत्रातील त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारी होती. विदुषकाच्या भूमिकेतील प्रसाद दामले यांचा रसिकांनी टाळ्यांच्या प्रतिसादात गौरव केला तर महंताच्या भूमिकेतील विनय शुक्ल यांनीही रसिकांचे लक्ष वेधून घेतले. दिग्दर्शक विजय सोनोने यांनी  प्रख्यात लेखक दिलीप जगताप यांच्या अतिशय क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या संहितेला अभ्यासू पध्दतीने रंगमंचावर सादर केल्याबद्दल मान्यवरांनी विशेष कौतुक केले. रंगमंच व्यवस्थापन शुभम सोरमारे, अमोल चांगाडे, शशिकांत इंगळे, संतोष पाटील, गणेश राणे, विलास मानवतकर, प्रतिक शेजोळ यांनी केले . 
     नाटकाच्या मध्यंतरात नाट्य निर्मिती प्रमुख डॉ. गणेश गायकवाड व महावितरणच्या नाट्य संघाचे प्रमुख इंजि. गणेश बंगाळे यांचा अक्षरदेहतर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. रसिकांना तृप्त करणारा व विचारांच्या कक्षा रुंदावणारा प्रयोग बघायला मिळाल्याने निर्मिती फलद्रूप झाल्याची भावना डाॅ. गणेश गायकवाड यांनी व्यक्त केली. पत्रकार राजेंद्र काळे यांनी शिवजयंती उत्सवाची रुपरेषा सांगून सहभागी होण्याचे आवाहन केले तर रवीकिरण टाकळकर व चंद्रशेखर जोशी यांनी गझलरंग कार्यक्रमाची माहिती दिली‌. 
       उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अक्षरदेहचे अध्यक्ष शशिकांत इंगळे यांनी केले. नाट्यप्रयोगाला बुलढाणा अर्बन, शारदा ज्ञानपीठ यांनी सहकार्य केले. प्रयोगाला विविध क्षेत्रातील नाट्य रसिकांनी गर्दी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नगर परिषदेच्या गलथान कारभाराचा नागरिकांना भुर्दंडजबाबदार अधिकाऱ्याकडूनखर्च वसूल करण्याची मागणी.

राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने कपिल घाटगे सन्मानित

अश्लील चाळे करणार्‍या जोडप्यांचा बंदोबस्त करण्याची भाजप सेलू ची पोलीस निरीक्षक सेलू कडे मागणी.