सेलू शहरासह संपूर्ण तालुक्यात ‘बंद’ला जोरदार प्रतिसाद.
शिवाजी शिंदे
सकाळपासूनच कडकडीत बंद.
सेलू : दि.14 मराठा समाजाच्या आरक्षणा च्या प्रश्नावर विशेष अधिवेशन बोलवावे, या मागणीसाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या बेमुदत उपोषणास पाठींबा म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवार 14 फेबु्रवारी रोजी पुकारलेल्या सेलू बंदच्या आवाहनास जोरदार प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्यातील सर्व व्यापारीपेठा, प्रतिष्ठाने संस्था पूर्णतः बंद होत्या. सेलू शहरात या बंदच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला व्यापारी महासंघाच्या सर्व व्यापार्यांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळेच विविध व्यापारी या आवाहनास प्रतिसाद देतील हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे बुधवारी सकाळपासूनच मध्यवर्ती भागातील तसेंच गल्लीतील व्यापारी पेठेतील एकही दुकान निर्धारित वेळेत उघडले नाही. अन्यत्रही तेच चित्र होते. बाजारपेठांमधून कडकडीत बंद पाळण्यात आला. त्यामुळेच सर्वदूर कमालीचा शुकशुकाट होता. सकल मराठा समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह अन्य कार्यकर्त्यांनी जथ्याजथ्याने शहरातील विविध भागात फिरुन व्यापार्यांना बंदचे आवाहन केले आणि आभारही व्यक्त केले. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं या घोषणांनी संपूर्ण बाजारपेठा दणाणून निघाल्या. क्रांती चौक, जवाहर रोड वालूर रोड, जिंतूर रोडसह अन्य भागातही कडकडीत बंद पाळण्यात आला. सायंकाळी उशीरा मात्र काही व्यापार्यांनी दुकाने उघडून आपला व्यवहार पूर्ववत सुरु केला.दरम्यान, तालुक्यात सुद्धा सर्व व्यापाऱ्यांनी सुध्दा या बंदच्या आंदोलनास जोरदार प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातही छोट्या मोठ्या खेड्यांमधील दुकाने बंद होती. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे त्या आवाहनास प्रतिसाद दिला. दरम्यान, जिल्हा पोलिस यंत्रणेने या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. ठिक ठिकाणी अधिकारी पेट्रोलिंग करीत होते. स्थितीवर नियंत्रण ठेवून होते. त्यामुळे या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
टिप्पण्या