शाही दसरा कोल्हापूरचा: फन स्ट्रीटवर कोल्हापूरकरांची धमाल
कोल्हापूर, दि.22 : दसरा चौक ते जयंती पुल या मार्गावर पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीने आयोजित फन स्ट्रीटवर आज विविध खेळ आणि कलाप्रकारांमध्ये सहभागी होत कोल्हापूरकरांनी धमाल केली. जुने खेळ, आट्या पाट्या, गलोर, गोट्या, भोवरा, गाणी, चित्र, मार्शल आर्ट, मर्दानी खेळ, गो कारटिंग, विटी दांडू, मातीची भांडी तयार करणे (टेराकोटा), गोट्या, स्केटिंग, झुंबा, रस्सीखेच, दोरी उड्या, आदी खेळांमध्ये सहभागी होत लहान मुलांसह अबालवृद्धांनी मनसोक्त आनंद लुटला. सहायक आयुक्त संजय सरनाईक, हॉटेल चालक मालक संघाचे उज्वल नागेशकर व सचीन शानबाग यांच्या हस्ते फन स्ट्रीट वरील विविध खेळ प्रकाराची सुरुवात झाली.
वेदिका भोसले, वरद बक्षी, दीक्षा सुतार यांनी सादर केलेली सुंदर गीते तसेच शिवम मगदूम, हर्षाली बेलवलकर यांच्या दमदार नृत्याविष्कारांवर रसिकांची पावले थिरकली. ओंकार रोकडे यांनी झुंबा डान्सच्या माध्यमातून चैतन्य निर्माण केले.
एस. के. रोलर्स स्केटिंग अकादमीचे स्केटिंग प्लेअर्स, अष्टविनायक भजनी मंडळाची हादगा, भोंडला गीते व नृत्य, बसवेश्वर लेझीम पथक व ऊर्जा लेझीम पथकासोबत कोल्हापूरकरांनी लेझीम खेळण्याचा आनंद घेतला. गौरव काइंगडे, शुभम कुंभार व अमन शेख यांनी तयार केलेली मातीची भांडी व खेळण्यांची (टेराकोटा) प्रात्यक्षिके पाहून लहानांसह मोठ्यांनीही मातीच्या वस्तू बनवण्याचा आनंद घेतला. अक्षय जाधव यांनी मुलांच्या हातावर काढलेल्या आकर्षक टॅटू नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. निशांत गोंधळी यांच्या निवेदनाने नागरिकांना खिळवून ठेवले.
कोल्हापूरातील अबाल वृद्धांनी फन स्ट्रीट वरील विविध खेळ प्रकाराची मजा लुटली. यावेळी दृष्टीबाधित दिव्यांग बांधवानी उपस्थितांना कोल्हापूर पर्यटनाची माहिती दिली.
यावेळी दसरा संयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते
टिप्पण्या