अमृताचा चटका लावणारा मृत्यू : तेलवे येथील घटना ; परिसरात हळहळ
पन्हाळा (प्रतिनिधी) : लग्न होऊन सहा महिने झाले. सुखाचा संसार फुलायला नुकतीच सुरवात झाली होती. मात्र, कदाचित नियतीला ती बघवली नसेल अन पन्हाळा तालुक्यातील तेलवे येथील अमृता संकेत कळेकर (वय २३) हिला चार दिवसापूर्वी किरकोळ ताप आल्याचे कारण होऊन खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले; पण उपचारादरम्यान तिचा मंगळवारी मृत्यू झाला. तिच्या अकाली मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पदवीपर्यंत शिक्षण घेतलेली अमृता ही वृत्तपत्र विक्रेते बबन कळेकर यांची सून! साध्या अनं मनमिळावू स्वभावाच्या अमृताचे माहेरदेखील पानकर कुटूंबातील तेलवे येथीलच. शांत व मनमिळावू स्वभावगुणामुळे बबन कळेकर यांनी त्यांचा मुलगा संकेत यांच्याशी अमृताचा विवाह ठरविला. सहा महिन्यापूर्वी मोठ्या थाटामाटात विवाह पार पडला. नवदाम्पत्य सुखी संसाराची स्वप्ने पाहत सुखाचा संसार करत असताना नियतीची अचानक सुखी संसाराला दृष्ट लागली. चार दिवसांपूर्वी अमृताला किरकोळ ताप आल्याने गावातील एका डाॅक्टरजवळ त्यांनी अमृतावर उपचार करून घेतले. दरम्यान, ताप कमी होण्याऐवजी तब्येत झपाट्याने खालावू लागल्याने तिला उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला साथ न मिळाल्याने मंगळवारी सायंकाळी अमृताची प्राणज्योत मालवली. अमृताच्या निधनाने कळेकर कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
*बोगस डाॅक्टरचा जीवाशी खेळ :*
तेलवे परिसरात दहावी नापास असलेल्या डाॅक्टरने अनेक वर्षापासून तळ मांडला आहे. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेत अघोर्या पद्धतीने उपचार करून लोकांच्या जीवाशी खेळ मांडून अनेकांना यामुळे जीव धोक्यात घालावा लागला आहे. हा महाशय अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे आता तर त्वचारोग तज्ञ म्हणून मिरवत आहे. ही बाब संबंधित अधिकार्यांना माहिती असून देखील कारवाई होत नाही, यावरून ग्रामस्थ संतप्त आहेत.

टिप्पण्या