डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाची किल्लेश्री पन्हाळगड मोहीम यशस्वीरीत्या संपन्न
कोल्हापूर
कोल्हापूर वृत्तसेवा
डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्रथम वर्ष एमएस्सी रसायनशास्त्र व एमएस्सी फूड सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांची किल्लेश्री पन्हाळगड मोहीम इतिहास अभ्यासक प्रसाद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली.कुलगुरू डॉ.के प्रथापन व कुलसचिव डॉ जयेंद्र खोत यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रसाद जोशी हे इतिहास अभ्यासक असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रशासनावर डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठांमध्ये पीएचडी शिक्षण घेत आहेत. २०१६ सालापासून त्यांनी आजवर अनेक गड-किल्ल्यांवरती मोहिमा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. त्यांनी आज विद्यार्थ्यांना पन्हाळगडावरती असणाऱ्या राजखिंड, पुसाटी बुरुज, मसई पठार, सदर, छत्रपती यांचे घर, शिवकालीन महादेव मंदिर, वीर शिवा काशीद यांचे योगदान, अशी बरीच ठिकाणे दाखवून प्रत्येक ठिकाणावर घडलेला सर्व इतिहास पुराव्यानिशी सांगितला व विविध लढायांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन व गनिमी कावा पद्धत कशी होती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रसाद जोशी म्हणाले" छत्रपती शिवाजी महाराज हे एक उत्तम प्रशासक होते व त्यांच्या प्रशासनाचा व गनिमी काव्याचा अभ्यास करून व्हिएतनाम या देशाने अमेरिकेशी झुंज दिली आहे. महाराजांनी त्यांच्या मावळ्यासोबत लढाया जिंकून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांचे कार्य महान आहे"
रिसर्च डायरेक्टर डॉ संदीप वाटेगावकर म्हणाले" डी वाय पाटील विद्यापीठ नेहमीच अशा उपक्रमांना पाठबळ देत असते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य व इतिहास विद्यार्थ्यांना पुराव्यानिशी समजावा या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते" असे बोलून त्यांनी प्रसाद जोशी यांचे आभार मानले.
यानंतर साहिल शाह, जयंवत माने या विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी डॉ तानाजी भोसले,प्रा. शीतल पाटील, प्रा.तेजश्री मगदूम, प्रा.स्वप्नाली भोळे व विद्यार्थी उपस्थित होते.
ही मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी डॉ. संदीप वाटेगावकर व टीम ने अथक परिश्रम घेतले.
असोसिएट डीन डॉ गुरुनाथ मोटे यांनी या मोहिमेसाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करून शुभेच्छा दिल्या.
मोहिमेच्या यशस्वी आयोजनाबद्दल कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार मा.ऋतुराज पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





टिप्पण्या