आरडगाव पाणी टंचाई निवारणार्थ प्रांताधिकारी यांनी केली ग्रामस्थांशी चर्चा : टँकर खेपा वाढवून देणार
लोणंद प्रतिनिधी दि. २९ : आरडगाव, ता. फलटण येथील पाणी टंचाई बाबत माहिती मिळताच प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, महसूल मंडलाधिकारी राहुल खाडे यांनी गावात जाऊन ग्रामस्थांची बैठक घेऊन ग्रामस्थांच्या अपेक्षा समजावून घेतल्यानंतर तातडीने टँकरच्या खेपा वाढवून देण्याचे आश्वासन दिले.
आरडगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित ग्रामस्थांच्या बैठकीत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत सरपंच रविंद्र शिर्के, उपसरंपच अरुणाताई भोईटे, मा.ग्रा.पं. सदस्य निलेश भोईटे, पत्रकार प्रतिक भोईटे, पोलीस पाटील अमित भोईटे, चंद्रकांत भोईटे, ग्रामविकासअधिकारी कर्णे, पत्रकार सुरेश भोईटे, विजय शिवाजी भोईटे,भिमराव भोईटे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवता येईल याविषयी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा करुन त्यांच्या अपेक्षा जाणून घेताना पाणी कोठून व कशा पद्धतीन आणल्यानंतर पाणी प्रश्न सुटेल याविषयी लोकांच्याबरोबर संवाद प्रस्थापित करीत प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी गावची लोकसंख्या व जनावरांची संख्या याविषयी माहिती घेतली, त्यावेळी,
लोकसंख्या १२०० व जनावरांची संख्या १३०० असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सध्या गावात २ दिवसात ३ खेपा म्हणजे अंदाजे ७२ हजार लिटर पाणी उपलब्ध होत असून शासन निर्णयानुसार गावची लोकवस्ती व जनावरांची संख्या लक्षात घेता ८० हजार लिटर पाणी उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे मात्र प्रत्यक्षात ७२ हजार लिटर उपलब्ध होत असल्याने आणखी ८ हजार लिटर पाणी तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देश प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना बैठकीत दिले.
धोम - बलकवडी धरणातील पाणी कसे सोडता येईल याविषयी बैठकीतून धोम - बलकवडी प्रकल्पाचे अधिकारी यांचेशी चर्चा केली. धोम - बलकवडी धरणात पाणी कमी असलेने ते तांबवे धरणात सोडले जाईल याविषयी खात्री देता येणार नाही पण प्रयत्न करण्याचे आश्वासन प्रांताधिकारी यांनी ग्रामस्थांना दिले.
जननायक लोकप्रिय आमदार दिपक चव्हाण यांना वरील पाणी टचाईविषयी आमचे प्रतिनिधीने कळवताच तत्पर पाण्याच्या तीन टँकरची सुविधा ऊपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक व अभिनंदन करणेत आले.
जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे १ कोटी रुपये खर्चाची पाणी पुरवठा योजना मंजूर असल्याचे निदर्शनास आणून देत त्यासाठी जल मिशन योजना तांबवे धरणांजवळ धरणालगत विहीर खोदून तेथून पाईप लाईनद्वारे पाणी उंच टाकीत आणून ग्रामस्थांना पुरेसा पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सुरेश भोईटे यांनी या बैठकीत सांगितले.
सदर पाईप लाईन वन विभागाच्या क्षेत्रातून चारी खोदून टाकण्यात येणार आहे, मात्र त्यासाठी वन विभागाची मान्यता नसल्याने सदर काम रखडल्याचे सुरेश भोईटे यांनी निदर्शनास आणून देताच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी बैठकीतून संबंधीत
वन अधिकारी यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली आणि सदर अडचण सोडवण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले.
धोम - बलकवडीचे पाणी आदर्की गावा जवळ पोटकालव्यातून हिंगणगाव येथील मालदेव धरणात व तेथून हिंगणगाव ओढ्याला सोडले आहे, तशा पद्धतीने आरडगाव येथील ओढयाला सोडले तर आरडगाव येथील शेती व लोकवस्तीसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटेल अशी माहिती शैलेश भोईटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना देत त्याबाबत प्रयत्न करण्याची मागणी केली.
धोम - बलकवडी धरण कालव्याचे पाणी तांबवे धरणात सोडून पोट कालव्याव्दारे लेंडीच्या तलावात सोडून सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरी लगत असणारे २ तलाव पूर्ण भरावेत म्हणजे ७/८ महीने आरडगावचा पाण्याचा प्रश्न मिटेल असे माजी सरपंच सुभेदार भोईटे यांनी बैठकीत सांगितले मात्र तलावात पाणी सोडण्या अगोदर विहिरीलगत असणाऱ्या दोन तलावांची खोली वाढवावी अशी सूचना माजी सरपंच सुभेदार भोईटे यांनी केली.
शैलेश भोईटे यांनी ग्रामसेवक कर्णे यांच्या कामाविषयीचा पाढाच सांगून चालू ग्रामसभेतून निघून जाणारा, लोकांच्या समस्या न जाणून घेणारा हा अधिकारी असून नसल्यासारखा असल्याचे निदर्शनास आणून दिले.
त्यावेळी प्रांताधिकारी ढोले यांनी सदर तक्रारी बाबत गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे यांना सदर ग्रामसेवक यांना सक्त ताकीद देण्याची सूचना केली.
यापूर्वी सुमारे ५० वर्षे ज्या विहीरीतील पाणी संपूर्ण गांव पिण्यासाठी व खर्चासाठी वापरत होते. या विहीरीची खुदाई ही ग्रामस्थांनीच लोकसहभागातून स्वखर्चाने केली आहे. या विहीरीचा कब्जाही त्वरित घेणे गरजेचे असलेचे सांगूण ती विहीर गावापासून जवळच अर्धा कि.मी. अंतरावर असून त्या विहीरीत सध्या पाणी साठा असल्याचे निदर्शनास आणून देत तेथून पाणी पाईप लाईन द्वारे आणले तर पाणी प्रश्न मिटेल असा विश्वास भिमराव भोईटे यांनी व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर बैठक संपताच प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, महसूल मंडलाधिकारी यांनी सरपंच, पोलिस पाटील, पत्रकार ग्रामस्थ यांना घेवून या विहीरीची पाहणी केली. त्या विहीरीतील पाणी पिण्यासाठी योग्य आहे किंवा नाही याची खात्री करुन घेण्यासाठी सदर पाण्याची तपासणी तत्पर करणेचे व प्राप्त अहवाल तातडीने उपलब्ध करुन देण्याचे स्पष्ट निर्देश प्रांताधिकारी यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.
लेंढी तलावा लगतच्या पिण्याच्या पाण्याच्या विहीरीची व तलावाची पाहणी केल्यानंतर जून्या वापरात असलेल्या विहीरीतील पाणी तपासणीसाठी तत्पर पाठवणेचे आदेश दिले. सदर पाणी तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदर पाणी वापराबाबत निर्णय घेण्याचे सूतोवाच प्रांताधिकारी यांनी केले. दरम्यान आणखी एक पिण्याच्या पाण्याचा टॅंकर वाढवावा अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी यांच्याकडे लावून धरली.

टिप्पण्या