कुंभार समाज हिताचे निर्णय घेणार : ना. सुरेश खाडे .अंकली येथे द्वीराज्यस्तरीय स्नेह मेळा व समाज बांधव कौतुक सोहळा संपन्न .
यड्राव (प्रतिनिधी ) : अल्पसंख्याक असूनही लिंगायत कुंभार समाजाने वास्तू उभारून समाजासाठी एक व्यासपीठ निर्माण केले आहे. हे कौतुकास्पद आहे. या समाजासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कायमच मी प्रयत्नशील आहे तसेच समाजाकडून आलेल्या मागण्यांबाबत बैठक घेवून कुंभार समाज हिताचे निर्णय घेणार असल्याचे आश्वासन कामगारमंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिले.
अंकली (ता.मिरज) येथील श्री लिंगायत कुंभार समाज सेवाभावी संस्था,महाराष्ट्र यांचे वतीने महाराष्ट्र व कर्नाटक राज्यस्तरीय वधू वर मेळावा व समाज बांधवांचा कौतुक सोहळा आयोजित करण्यात आले होता . या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
संत गोरोबाकाका माती कला बोर्डची अंमलबजावणी करा, लिंगायत कुंभारांना ओबीसी दाखल्याबाबत येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, विश्वकर्मा योजनेअंतर्गत कुंभार समाजास बिनव्याजी कर्ज मिळावे, कुंभार कलेचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना शासनामार्फत उत्पादनासाठी व उत्पादित वस्तू विक्रीसाठी जागा मिळावी, वीट उत्पादन करणाऱ्या कुंभारांना मातीची रॉयल्टी शंभर ब्रासला करावी व काळम्मावाडी धरणास देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांचे नाव द्यावे अशा मागण्यांचे निवेदन यावेळी ना. खाडे यांना देण्यात आले.
या सोहळ्यासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील लिंगायत कुंभार बांधवानी उपस्थिती लावली होती.
यावेळी समाज बांधवांनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून,शाल, फेटा बांधून कौतुक करण्यात आले.तसेच दिनदर्शिका व मासिकाचे अनावरण ही करण्यात आले.
स्वागत अध्यक्ष किरण कुंभार यांनी केले. प्रास्ताविक राजेंद्र कुंभार यांनी केले. यावेळी डॉ. सुहास कुंभार, सोमनाथ कुंभार,सुरेखा कुंभार, शेखर इनामदार, यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी , लक्ष्मण कुंभार , दत्तात्रय कुंभार , भरत कुंभार प्रभाकर धामणीकर ,सूरज गाडगीळ, प्राचार्य राजेंद्र कुंभार,डॉ. उत्तम कुंभार,उद्योजक आर. टी.कुंभार, विठ्ठल कुंभार,बाळू कुंभार, यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार दत्तात्रय कुंभार यांनी मानले. या क्रार्यक्रमासाठी घन:शाम कुंभार यांचे सहकार्य लाभले.
टिप्पण्या