मोठ्या उत्साहात साजरी होणारी रमजान ईद....!!!
तब्बल ४० डिग्रीपेक्षा जास्त तापमानात दिवसभर अन्नपाण्याचाही त्याग करून अल्लाहचरणी लिन होऊन रोजा करण्याची ताकद इबादत करणार्या मुस्लिम समाजातील मुलामुलींमध्ये स्त्री पुरूष प्रत्येक आबालवृद्धांमध्ये आहे हे खरोखरच अचंबित करणारे आहे...शेवटी शेवटी असर च्या (रोजा सोडण्याआधीची शेवटची) नमाजपूर्वी वुजू करताना पाणी गळ्यामध्ये घसा स्वच्छ करण्यासाठी तर घ्यायचे पण गळ्याखाली नाही उतरू द्यायचे तेही पहिटेपासून अन्नच नाही तर पाण्याचा थेंबही पोटात घेतला नसताना.. ह्या भक्ताचा(बंदा) हा त्याग पाहुन अल्लाहमियॉ आपल्या देवदूताला(फरिश्ते) मोठ्या अभिमानाने सांगत असेल,बघ माझ्या भक्ताच्या मनावर किती संयम आहे...
जगाच्या पाठीवर आखाती देशांसह तब्बल दोन नंबरची लोकसंख्या असलेला प्रेषित मुहम्मद पैगंबरांच्या पवित्र विचारांवर चालणारा हा इस्लाम धर्म...आणि इस्लाम च्या विचारांना, आचरणाला अधोरेखित करणारा हा रमजान महिना.. तब्बल ३० दिवस असा कडक उपवास (रोजे) रणरणत्या उन्हातही करायचे आणि तेही स्वतः चा नोकरी ,व्यवसाय ,कष्टाचे काम सांभाळून.. दिवसभरात फजर जोहर असर मगरीब व ईशा या पाच वेळच्या नमाज पठण ही चुकवायचे नाही..काय असेल यामागचा उद्देश..? तर जगातील अनेक लोक हे इतके दारिद्र्यात आहेत की दिवसभर त्यांना अन्नाचा एक कणही मिळत नाही..कांहीं ठिकाणीं वस्ती इतकी ओसाड आहे की त्या ठिकाणी पर्जन्यमान अत्यंत कमी आहे.. वरूणराजाने गेली कित्येक वर्षे तिकडे पाठ फिरवली आहे... त्यामुळे पाण्याचा थेंबही शोधून काढावा लागतो तिथे तहान भागवणेही मुश्किल आहे.. अश्या प्रदेशातील मानवजातीचे दुःख,जीवन कसे असेल हे आजमावण्याचा हा छोटासा प्रयत्न असे म्हंटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही...
शिवाय इस्लाम धर्मातील चांगुलपणा मानवता दया क्षमा शांती या दैवी देणग्यांचा अंगीकार महिनाभर करून त्याचीच सवय उरलेल्या संपूर्ण वर्षातही लागावी हाच या पवित्र महिन्याचा उद्देश आहे...
शांतीच्या वाटेवर जाताना आपण जरी उपवास केला तरी शेजारील कुठल्याही जाती धर्माची कोण ही व्यक्ती दुःखी कष्टी उपाशी निराधार राहु नये यासाठी त्यांना सर्व सुविधा पुरविण्याची शिकवण पवित्र कुराणात दिली आहे...
नविन पिढीला पवित्र कुराणाचा परिपाठ व्हावा यासाठी या ३० दिवसांत रात्री च्या नमाजपठणानंतर कुराणाची आयाते मौलानांकरवी तराविह च्या माध्यमातून ऐकवली जातात.
महिन्याभरातील या खडतर उपवासाने तेजस्वी चेहर्यावरून अल्लाहची भक्ती ओसंडून वाहत असते.शेवटच्या रोजानंतर दुसऱ्या दिवशी ईदगाह मैदानावर किंवा मोठ्या मशिदीमध्ये ईद साजरी करण्यासाठी नमाजपठण होते, त्यामध्ये विश्वबंधुत्व जोपासण्यासाठी संपूर्ण मानवजातीला सुख समृद्धी भरभराट यावी यासाठी दुवा मागितली जाते.
बुजूर्ग(वृद्धांसाठी) मृत्यूनंतरही जन्नत ( स्वर्गप्राप्ती) प्रार्थना केली जाते.विवाह इच्छुकांसाठी लग्न जमावे म्हणून अल्लाह चरणी आर्जव केली जाते.विधवा महिला अनाथ मुलांसाठी जकात सदका दिला जातो..
गोडधोड शिरखुर्म्याची मेजवानी इतर धर्मातील बंधू भगिनींना ईद दिवशी आयोजित केली जाते
इस्लाम धर्म नेहमीच शांती समाधान व मानवसेवा या त्रिसूत्री चा अवलंब करत आला आहे त्याचा प्रचार या रमजान ईद च्या निमीत्ताने होणे गरजेचे आहे हे शतप्रतिशत खरेच... विशालक्रांती न्यूज प्रतिनिधी राजू सिकंदर नदाफ इचलकरंजी.
टिप्पण्या